Sunday, May 9, 2021

Shilpa Bhosekar on her Aatya

दिनांक २६ मार्च २०२१. ह्या दिवशी लाडक्या आत्याला देवज्ञा झाली. तिच्याकडे जाताना घर जसे जवळ येत गेले तसे पळून जावेसे वाटायला लागले. नको तिथे जायला, नको आत्याला असे भेटायला असेच वाटत होते. त्या गल्लीतून वळताना, घरी गेल्यावर बागेतून आत जाताना कितीतरी गोष्टी आठवत होत्या. पहिलाच 3 छोट्या पायऱ्या आणि छोटासा उतार, ज्या वरून लहानपणी कित्येकदा घसरगुंडी खेळली आहे आम्ही पोरांनी. मग एक वऱ्हांडा जिथे आमचे ब्रिज प्रेमी काका, पपा , चान्स मिळाला तर मोठे दादा, तासनतास पत्ते खेळत बसायचे. भरपूर वेली, छोटी झाडे याने मस्त वाटायचे तिथे. आत गेलो की हॉल मग kitchen, एक बेडरूम जिच्या खिडकीतून रातराणीचा वेल दिसायचा आणि वास पण मस्त सुटलेला असायचा.  मागे पण एक मोठी बाग. तिथला कडीपत्ता आधी आत्या आणि आता ताई  निघताना कायम हातात  देणारच, भरपूर फुले पण. 

आत्याकडे जात तर असायचोच पण पक्के ठरलेले दिवस म्हणजे भाऊबीज आणि श्रावणी शुक्रवार. सगळा स्वयंपाक तयार असायचा बाकी पण पुपो आत्या गरम गरम च करून द्यायची. तिचा हातचे चविष्ट जेवण जेवलो की शाळेला दांडी मारणे क्रमप्राप्तच. जेवण झाल्यावर गुंगावून जात तिथेच गार गार हॉल मध्ये एक पडी टाकण्यात जे सुख असायचे ते वर्णन नाही करू शकत. संध्याकाळी निघताना वाईट वाटायचे पण पूपो पार्सल जरा जीवाला आनंद द्यायचे. आणि हो, निघायच्या आधी बागेला पाणी घालणं हा पण एक आनंदाचा भाग असायचा. गरम तापलेल्या जमिनीवर तो पाण्याचा फवारा मारला की जो काही सुगंध सुटायचा तो आजही नाकात शिरला लिहिताना. पाण्याने प्रसन्न झालेली बाग पाहताना मस्त वाटायचे.  भाऊबीज तर धमालच असायची सगळी. दिवसभर जेवण धमाल पत्ते रात्री कधी VCR वर पिक्चर. संध्याकाळी आम्हा मुलींचे तासनतास नटणे , तो दिवस बहिणींचा असल्याने कोणी काही बोलत पण नसे जास्त, चला ग आवरा लवकर यापेक्षा. सगळ्या भावांना ओवळताना आत्या खुश असायची एकदम. अशी भाऊबीज आता परत होणे नाही. मला आठवते एका भाऊबीजेला मी आणि राजुदादा श्रीखंड करत होतो. दोघही नुकतीच साखर घातलेला लुसलुशीत मध्येच खडबडीत असा चक्का खात होतो, म्हणजे चव घेत होतो 😝 नेवैद्य दाखवायचा होता तरी ती ते आम्हाला करू देत होती हे मला त्यावेळी वाटलेल नवल होत. गणपतीत 5 व्या दिवशी तिच्याकडे जायचो. आणि ते आमच्याकडे 10 व्या दिवशी यायचे. तेव्हा लवकर येऊन उकडीचे मोदक करणारी आत्या आठवतीय. तिन्ही लाडक्या मुलांचे, नातवांचे कौतुक सांगताना तिचा चेहरा एकदम बोलका व्हायचा. आम्ही मुली आता भेटायला गेलो कधी की आठवणीने निघताना छोटासा खाऊ म्हणून पाकीट हातात ठेवयाची. या आणि अशा अनेक आठवणी.

आत्या, तू सर्वच प्रकारचे दिवस अनुभवलेली आणि सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेली लाडकी बहिण, आई , पत्नी आणि आम्हा मुलांची आत्या आहेस आणि कायम मनात अशीच राहशील हसरी, आनंदी, चेष्टेखोर. 

1 comment:

Think Positive

 "Think positive!" That is the eternal advice each and everyone hurls at you. Often the example that would go with it is that of S...